Sharad Pawar: शरद पवारांनी अंडरवर्ल्डपासून मुंबई वाचवली, मोदींचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:36 PM2022-03-14T14:36:34+5:302022-03-14T14:37:42+5:30
माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून शरद पवार हे दाउदचे हस्तक असल्याचे म्हटले होते.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणार्या आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी फिर्याद दिली आहे. निलेश राणेंनी शरद पवारांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडल्याने राष्ट्रवादीने नेते व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींचा एक व्हिडिओ शेअर करत मोदींनी शरद पवारांबद्दल काय म्हटलं होतं, ते सांगण्याचा प्रयत्न केलाय.
माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून शरद पवार हे दाउदचे हस्तक असल्याचे म्हटले होते. तर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांना दाऊदचा हस्तक तसेच पाकिस्तानी एजंट असे संबोधले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मुंबईला अंडरवर्ल्डच्या तावडीतून वाचविण्यात शरद पवारांच मोठं योगदान आणि कौशल्य असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी pic.twitter.com/bOpBATgiTT
मुंबई पाऊस जरी पडला तरी थंडी दिल्लीत वाजते असं मुंबई-दिल्लीचं नातं आहे. मुंबई देशाचं आर्थिक केंद्र आहे, एक काळ एक दशक असं आलं होतं. ज्यावेळी, मुंबईला अंडरवर्ल्डने काबीज केलं होतं, एक अंधार पसरला होता, मुंबई जर अंडरवर्ल्डच्या हातात गेल, तर काय होईल, अस वातावरण तयार झालं होतं. पण, मी म्हणतो शरद पवारांच ते कौशल्य आणि हिंमत होती की, त्यांनी अंडरवर्ल्डपासून मुंबईला वाचवलं, मुंबईला त्यातून बाहेर काढल, हे त्यांच सामर्थ्य होतं, असे मोदींनी एका कार्यक्रमातील भाषणात म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
निलेश राणेंविरुद्ध गुन्हा
शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन गाठले. हरी निवास सर्कल ते पोलीस ठाणे असे चालत जावून हा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी फिर्याद देऊन भादंवि 120 ब, 153, 153(अ) , 499, 500,505 (1) ,505 (1) क , अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी फिर्यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.