Sharad Pawar: शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेनं जुना संदर्भ देत लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:14 PM2022-05-28T13:14:54+5:302022-05-28T13:20:23+5:30
Sharad Pawar: पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी शरद पवार दर्शन घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरातील गणपतीचं बाहेरूच दर्शन घेतलं. त्यानंतर यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. सोशल मीडियावरही या दर्शनाची चांगलीच चर्चा रंगली. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मनसैनिकांनी आता पुन्हा एकदा या दर्शनावरुन राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सोशल मीडियातून बाहेरुन केलेल्या दर्शनावर टीका केली आहे.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी शरद पवार दर्शन घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच ते भीडे वाड्याचीही पाहणी करणार होते. मात्र, त्यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं. दरम्यान, त्यांनी मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नसल्याचं पुण्याच्या शहराध्यक्षांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर, मनसेनं शरद पवारांच्या या दर्शनावरुन टीका केली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन पवारांना टोला लगावला आहे. विशेष म्हणेज त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही शरद पवारांचं नाव घेतलं नाही. पण, त्यांनी पावसातील भाषणाचा संदर्भ इथं दिला आहे.
पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे 🙏🏽
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 27, 2022
''पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे'', असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पाहायला मिळत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढी पाडव्यापासूनच्या प्रत्येक भाषणात शरद पवारांवर टिका केली आहे. त्यामुळेच, मनसेचे इतर काही नेतेही शरद पवारांवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार बृजभूषणसिंह यांच्यासमेवतच्या फोटोवरुनही मनसे विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगला होता.
त्यांच्यावर बॅन आणा
“प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. गेलं तर म्हणायचं का गेले. नाही गेलं तर म्हणायचं हे नास्तिक आहेत. हे तुम्ही दाखवायचं बंद केलं की बोलणारेही बंद होतील. असलं बोलणाऱ्यांच्या वर तुम्ही बॅन आणला पाहिजे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. माध्यम प्रतिनिधींशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. तसेच, केवळ मंदिराच्या आतच जाऊन माथा टेकला तर खरं दर्शन का, कधीकधी तर पंढरपूरला आपण पायरीचं दर्शन घेतो, असेही अजित पवार यांनी म्हटले.