मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईने भारतीय क्रिकेटला जगविख्यात क्रिकेटपटू व लिटील मास्टर सुनील गावस्कर आणि भारताचा मधल्या फळीतील प्रसिद्ध क्रिकेटपटू व माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हे दोन महान फलंदाज दिले. सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही महान क्रिकेटपट्टूच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला जाणार आहे.
लिटील मास्टर व माजी कर्णधार सुनील गावस्कर व माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी क्रिकेटमध्ये केलेल्या दैदिप्यमान कामगिरीबद्धल येत्या 29 ऑक्टोबर रोजी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यासह भारताचा माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ आणि सचिन तेंडुलकरही हे दोघंही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
येत्या 29 ऑक्टोबर रोजी माधव मंत्री यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून वानखेडे स्टेडियमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका बॉक्सला लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचे कायमस्वरूपी नाव देण्यात येणार आहे. तर वानखेडे स्टेडियमच्या एका स्टँडला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात येणार आहे. आजच्या झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर हे विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीला उपस्थित होते. मुंबईनं भारतीय क्रिकेटला दिलेल्या दोन महान फलंदाजांच्या गौरवासासाठी शरद पवार व मुख्यमंत्री या दोन प्रमुख नेत्यांना सोहळ्याला निमंत्रित करावे, अशा मिलींद नार्वेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमतानं अनुमोदन दिले.