Sharad Pawar: ...म्हणून शरद पवारांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची खेळी खेळली?; राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:09 AM2023-05-03T10:09:49+5:302023-05-03T10:10:47+5:30
Sharad Pawar: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मंगळवारी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज घोषणा केली. मात्र सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
पवारांच्या या धक्क्याने पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असून, पवारांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पवारांचे भाषण संपल्यानंतर नेत्या, कार्यकर्त्यांनी पवारांना अक्षरशः घेराव घातला. जोपर्यंत पवार आपला निर्णय बदलत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली. पवारांच्या समोरच जवळपास पावणेदोन तास हे नाट्य सुरू होते. यावेळी पवारांबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही स्टेजवर उपस्थित होत्या.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह लक्षात घेता, आपल्या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी द्यावा, असा निरोप शरद पवारांनी आंदोलन करणारे कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांना दिला. अजित पवार, छगन भुजबळ आणि रोहित पवार यांनी पवारांशी चर्चा केल्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे येऊन कार्यकत्यांना पवारांचा हा निरोप दिला. राज्यभरातून, तसेच देशभरातूनही फोन येत आहेत. मात्र, विचार करायला वेळ द्यावा, असे पवारांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. या निरोपानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
शरद पवार, राजीनामा अन् चर्चांना उधाण-
अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांना नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. वयाच्या ८३व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे शरद पवार यांनी दाखवून देण्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे.
कोण होणार नवीन अध्यक्ष?
पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभा सदस्य असलेले आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची ही चर्चा आहे. याशिवाय सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.