Join us

Sharad Pawar : राज्यात कठोर निर्बंधाशिवाय पर्याय नाही, शरद पवारांची महाराष्ट्राला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 11:14 AM

Sharad Pawar : राज्यातील वैद्यकीय स्टाफ अहोरात्र झटक असून परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहे

ठळक मुद्देराज्यातील वैद्यकीय स्टाफ अहोरात्र झटक असून परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही.

मुंबई - राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर राज्यातील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना परिस्थिती अत्यंत भीषण असून हा कसोटीचा काळ आहे, या काळाला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी म्हटले. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील वैद्यकीय स्टाफ अहोरात्र झटक असून परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी, केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परिस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पवार यांनी म्हटलं.   

काय म्हणाले फडणवीस 

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. 

संजय राऊतांची भूमिका

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी. राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडं आहे. सरकार येतं आणि सरकार जातंही, पण जे लोकं सरकार निवडून देतात, तीच जगली नाही, तर राज्य आणि सरकार काय कामाचं. सरकाराने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली आहे, असेही राऊत यांनी म्हटले

राज्यात ब्रेक द चेन मोहीम

‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत व्यापारावर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची जोरदार मागणी करत सलग दुसऱ्या दिवशी राज्यात विविध ठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे येत्या दोन दिवसांत काही निर्बंध शिथिल करण्याचे किंवा त्यात सुटसुटीतपणा आणण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यापारी संघटनांबरोबरच्या बैठकीत दिले. त्यामुळे दोन दिवसांत व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस