Join us

'सुप्रिया सुळे, रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार'; शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 4:51 PM

गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ट्विटरवरुन धमकी आल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांत दिली होती.

मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ट्विटरवरुन धमकी आल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांत दिली होती. या आरोपात अरावतीच्या सौरभ पिंपळकर या तरुणाने धमकी दिल्याचे म्हटले होते, या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. स्वत: सौरभ पिंपळकर याने माध्यमांसमोर येत आपण अशी कोणतीही धमकी दिली नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचा दावा त्याने केला आहे. 

जाहिरात वादावर शरद पवारांचा भाजप-शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले, “ऐतिहासिक काम झाले...”

'पवारांचा दाभोळकर होईल, असं कोणतही ट्विट मी केलेलं नाही, असं सौरभ पिंपळकर याने म्हटले आहे. सौरभ पिंपळकर म्हणाले, मी असं कोणतही ट्विट केलेलं नाही, माझ्यावर हे आरोप केल्यामुळे आमची समाजात बदनामी झालेली आहे. माझ्या वडिलांनाही मनस्ताप झाला आहे. त्यांनी कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता आरोप केले. यामुळे आता आम्ही सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे पिंपळकर यांनी म्हटले आहे. 

आरोप काय होते? 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी दिल्याने  शुक्रवारी एकच खळबळ उडाली. यानंतर पवार यांच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. 

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासोबत मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  

मास्टरमाइंड शोधा

धमकीमागचा खरा मास्टरमाइंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले.

कुठे आणि कशी दिली धमकी?

- ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. हे अकाउट मात्र लॉक आहे. अमरावतीचा राहणारा सौरभ पिंपळकर हा या फेसबुक पेजचा मॉडरेटर (ॲडमिन) आहे. - आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख पिंपळकर याने आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये केलेला आहे. ‘मी भाजपचा कार्यकर्ता आहे, मी धर्मनिरपेक्षतेचा द्वेष करतो’ असे त्याने लिहिलेले आहे.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसपोलिससुप्रिया सुळे