Join us

'शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडीचा धसका घेतला, म्हणूनच माघार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:32 PM

लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांकडून पवार यांच्या भूमिकेवरुन आपली मतं मांडण्यात येत आहेत. माढा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मोठी ताकद निर्माण केली आहे, त्यामुळेच पवारांनी धसका घेऊन माघार घेतली असावी, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. 

लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, रामदास आठवलेंनीही कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना, अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तर, शरद पवार यांच्या निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेवरही आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत पवारांची खिल्ली उडवली. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असे आठवले म्हणाले. त्यानंतर, आता प्रकाश आंबेडकर यांनीही पवारांच्या निवडणूक न लढविण्याचं कारण सांगितलं आहे. 

'माढा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने मोठी ताकद निर्माण केली आहे. माढा मतदारसंघात आमचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे, याचा धसका शरद पवार यांनी घेतला असावा. म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली' असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांच्या निवडणूक न लढविण्यावर भाष्य केलं. पवारांनी निवडणूक न लढवणं हा भाजपाचा पहिला विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :प्रकाश आंबेडकरशरद पवारलोकसभा निवडणूक २०१९