शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया, पित्ताशयाच्या विकाराचे झाले निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:02 AM2021-03-30T07:02:49+5:302021-03-30T07:05:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्या केल्यानंतर पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवार यांना पुन्हा बुधवार, ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी व शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पवार बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आ. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व निवडणूक प्रचार दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या.
दिग्गजांकडून विचारपूस
n केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे पवार यांनी ट्विटरवर सांगितले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले.
n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले.