मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना काल तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Sharad Pawar Health Update ) पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. दरम्यान हा त्रास अधिकच वाढल्याने पवार यांच्यावर रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Sharad Pawar underwent immediate surgery at night, Rajesh Tope gave important information about his condition)
शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरीश शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.
तर शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितले की, काही चाचण्या घेतल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली.
शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पवारांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र आज अचानक त्रास सुरू झाल्यानं पवार रुग्णालयात दाखल झाले होते.