Join us

Sharad Pawar: २४ तासात हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल; शरद पवारांचा कर्नाटकला रोखठोक इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 3:52 PM

गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळं वळण देण्याचं काम केलं जात आहे.

मुंबई-

गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळं वळण देण्याचं काम केलं जात आहे. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसंच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 

"बेळगावात आज जे घडलं ते निषेधार्ह आहे. सीमाभागात काही घडतं तेव्हा कटाक्षानं सीमाभागातील काही घटक माझ्याशी संपर्क साधतात. माझ्याकडे जी माहिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे. मराठी भाषकांवर दहशतीचं वातावरण आहे, कार्यालयासमोर त्यांचे पोलीस, महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. निवेदन देण्यासही मज्जाव केला जातोय. आज महाराष्ट्रातील ट्रकची तोडफोड केली गेली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्य देशाच्या ऐक्याला धोका देणारी आहे. महाराष्ट्रानं संयम पाळला पण त्यालाही मर्यादा असतात. सीमावाद सोडवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर पुढे जाऊन कुणी कायदा हातात घेतला तर त्याच्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल. केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही", असा स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी दोन्ही राज्यांच्या सरकारला इशारा दिला आहे.   

दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून अपेक्षाभंग"खरंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच वादग्रस्त वक्तव्यांची सुरुवात झाली. पण त्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाद शमवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. तेही काही होताना दिसलेलं नाही. आता दिवसेंदिवस वाद चिघळत आहे. दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून यावर चर्चा होऊन वाद शमवण्याची अपेक्षा होती. पण तसं काही होताना दिसत नाहीय. आता १९ डिसेंबरपासून कर्नाटकचं अधिवेशन होणार आहे. ही देखील पार्श्वभूमी आहे. बेळगावातील मराठी भाषकांवर दहशतीचं वातावरण तयार केलं जात आहे", असं शरद पवार म्हणाले.

टॅग्स :शरद पवार