शरद पवार क्या है, क्या है शरद पवार...
By अतुल कुलकर्णी | Published: May 7, 2023 12:09 PM2023-05-07T12:09:21+5:302023-05-07T12:10:59+5:30
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये समीर चौगुले एक पात्र सादर करतात. गझल क्या है .... असे म्हणत, ते अफलातून विडंबन सादर करतात. एखादा विषय माहिती नसताना, त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची अवस्था समीर चौगुले उत्तम रीतीने मांडतात. तसेच काहीसे शरद पवार यांच्या बाबतीत आहे. त्यांच्याविषयी मला सगळी माहिती आहे, असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांनादेखील काही अडेनिडे संदर्भ विचारले, तर त्यांची अवस्था समीर चौगुलेसारखी होईल. मग ते म्हणू लागतील, शरद पवार क्या है... क्या है शरद पवार... .....
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
कोणालाही न समजणारे, कधीही हाती न लागणारे शरद पवार एखादी गोष्ट करायची असेल तर त्या विषयाच्या अनुषंगाने खुली चर्चा घडवून आणतात. त्यासाठी दोन ताजी उदाहरणे लगेच देता येतील. आपल्या पक्षातले काही लोक ईडीच्या दबावामुळे कसे बाहेर जात आहेत, याची बंद दाराआड झालेली चर्चा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यामार्फत माध्यमांसमोर आणली गेली. त्याआधी काही दिवसांपूर्वी त्यांनी अंकुश काकडे यांना, जर पक्षात बंड झाले तर अजित पवार यांच्यासोबत किती आमदार जातील याची चाचपणी करायला सांगितले होते. ही माहिती बाहेर जावी म्हणूनही त्यांनी अंकुश काकडे यांची निवड केली असावी..! त्यावेळी शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, अशी चर्चाही नव्हती. एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणायची असेल किंवा जनतेच्या मनात काय आहे, हे बघायचे असेल तर शरद पवार तो विषय माध्यमात सोडून देतात. अनपेक्षितपणे विषय समोर आला की, लोक त्यावर चहूबाजूने चर्चा करतात, मतं मांडतात. चॅनल्स डिबेट घेतात. इकडे पवारांना बसल्या जागी त्या विषयाचा सर्व बाजूने कोणत्याही एजन्सीकडून सर्व्हे न करून घेता फीडबॅक मिळतो. त्यांना ज्यांचे मत हवे आहे, असे लोकही कुठली ना कुठली बाजू घेऊन त्यांच्यासमोर उघडे पडू लागतात. (जसे राजीनाम्याच्या घोषणेच्या दिवशी अजित पवार) ही खेळी त्यांनी अवलंबल्याची अनेक उदाहरणे देता येतील. आपलाच शब्द अंतिम आहे, असे ते कधीही म्हणत नाहीत. मात्र त्यांनी जे सांगितले, तेच कसे बरोबर, असे वाटणारी परिस्थिती निर्माण करण्यात ते माहिर आहेत.
कार्यकर्त्यांना, जनतेला सामोरे जाणारे शरद पवार वेगळे असतात. पण, एखाद्या पदाच्या भूमिकेत शिरून बोलणारे पवार पूर्णपणे वेगळे असतात. त्यावेळी ते अधिकारवाणीने अभ्यासपूर्ण मांडणी करतात. आजवर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जोडलेले विचारवंत, अधिकारी, लेखक, वकील, इंजिनीअर, डॉक्टर यांच्याकडून माहिती घेण्याची त्यांची स्वतंत्र यंत्रणा आजही आहे. ते मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी त्यांच्याकडे ब्रिफिंगसाठी यायचे. दहापैकी नऊ घटनांची माहिती अधिकारी घेऊन यायचे. मात्र शरद पवार नेमके तयारी करून न आलेल्या दहाव्या विषयाबद्दल त्यांना विचारायचे. शिवाय अधिकाऱ्यांनी मांडलेल्या नऊ विषयांवर त्यांच्याकडे वेगळीच माहिती असायची. तुम्ही या विषयाकडे अमुक अँगलने बघा, असे सांगून ते अधिकाऱ्यांना निरुत्तर करायचे. हा स्वानुभव सांगणारे अनेक वरिष्ठ अधिकारी आजही हयात आहेत. आनंद भडकमकर, शरद काळे, ललित दोशी हे अधिकारी आज हयात नाहीत. मात्र ते आणि त्यांच्यासह यशवंत भावे, बापू करंदीकर, मधुकर कोकाटे, श्रीनिवास पाटील, अजित निंबाळकर, विनायक राणे अशा कितीतरी अधिकाऱ्यांची मजबूत टीम शरद पवारांकडे असायची. १९९३ ला लातूरला भूकंप झाला, तेव्हा ते स्वतः सोलापुरात बसले. मुंबईत आनंद भडकमकर यांच्या नेतृत्वाखाली कंट्रोल रूम केली गेली. भूकंपात झालेले सगळ्यात मोठे काम म्हणून लातूर, उस्मानाबादमधील कामाची आजही नोंद आहे. हे एक उदाहरण झाले, असे शेकडो सांगता येतील.
जे कौशल्य प्रशासकीय पातळीवर त्यांनी दाखवले, त्यापेक्षा जास्त सजगपणे त्यांनी राजकारणही केले. आपल्याला थेट टक्कर देण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांना त्यांनी कधीही आव्हान दिले नाही. जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवार यांचे म्हणूनच मैत्रीपूर्ण संबंध टिकले. तीच मैत्री त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिली.
बाळासाहेबांना आव्हान देण्याचे काम त्यांनी कधीही केले नाही. उलट त्यांच्यासोबत भागीदारीत एक व्यवसायही त्यांनी करून पाहिला. मंत्री म्हणून विलासराव देशमुख यांच्यासोबतचे त्यांचे वागणे आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबतचे वागणे ज्यांनी जवळून पाहिले त्यांना हा फरक सहज लक्षात येईल.
गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध आले. त्या संबंधातून त्यांनी आजवर कधीही मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नाही. हे काही अपवाद सोडले तर पवारांनी कधी कुणाची तमा बाळगली नाही.
अफाट जनसंपर्क, लोकांचे ऐकून घेण्याची कमालीची सहनशीलता, कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांची नावं स्मरणात ठेवून त्यांना नावानिशी बोलण्याची कला आणि टोकाची जिद्द या गोष्टींमुळे पवार कायम इतरांपेक्षा शंभर पावलं पुढे राहिले. लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचा गुण त्यांच्या पक्षातल्या एकाही नेत्याला घेता आलेला नाही.
राजीनामानाट्य रंगले त्यादिवशी जयंत पाटील भावनिक झाले तेव्हा चार बोटाच्या अंतरावर बसलेल्या शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावर हाताने साधे थोपटलेही नाही. तेवढा भावनिक ओलावा ते सहज दाखवू शकले असते. मात्र ते त्यांनी केले नाही. हे शरद पवार बघण्या-अनुभवण्याचे आहेत.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी, काकांकडे लक्ष ठेवा, असा सल्ला अजित पवार यांना दिला होता. गेल्या काही दिवसांपासून देशाचे राजकारण काकांकडे लक्ष ठेवून आहे. जे राज ठाकरे यांना कळाले ते इतरांना कळाले तर काकांच्या हालचालीचे अर्थ ते काढू शकतील. असो; पण शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? तो पुन्हा मागे का घेतला? आता ते कोणते बदल करतील? याची उत्तरं त्यांच्याशिवाय कोणाकडेही नाहीत. मात्र, या घटनेने त्यांनी राष्ट्रवादी पक्ष ढवळून काढला. अजित पवार यांच्या त्या दिवशीच्या वागण्याने अजितदादांनी स्वत:च स्वत:विषयी प्रश्न निर्माण करून ठेवले. जे कोणी भाजपच्या वाटेवर होते त्यांना एका झटक्यात शरद पवारांनी मागे वळवले किंवा विचार करायला भाग पाडले.
या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न उरतोच... तो म्हणजे, शरद पवार पुढे काय करणार..? अर्थात, याचे उत्तरही त्यांनाच ठाऊक..! म्हणूनच त्यांच्याविषयी बोलताना, शरद पवार क्या है... क्या है शरद पवार... अं.... अशी अवस्था होते ती उगाच नाही...