मुंबई
देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून विशेषत: सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाच पैकी तीन राज्यांमध्ये निवडणूक लढणार असल्याचं पवार यांनी जाहीर केलं आहे. यासोबत लवकरच शरद पवार लवकरच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि आणखी काही छोट्या-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करुन निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मी स्वत: देखील उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. उत्तर प्रदेशात आज जनतेला बदल हवा आहे. या निवडणूकीत जनता उत्तर प्रदेशात बदल घडवून आणेल याचा विश्वास आहे", असं शरद पवार म्हणाले.
मुंबईत शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
योगी सरकार धार्मिक तेढ निर्माण करणारं"मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेलं सरकार बाजूला सारणं महत्त्वाचं आहे. देशात सर्वधर्मसमभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल", असा एल्गार शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.