कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठक बोलाविली असून, या बैठकीत कल्याण, डोंबिवलीतील अंतर्गत कलहावर स्थानिक पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
अंतर्गत गटबाजी आणि वाद हे समीकरण राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. कल्याण लोकसभेत झालेल्या पराभवातूनही राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बोध घेतलेला नाही. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेच्या निमित्ताने ‘पाणी’ या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या वक्त्यांसमोरच राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि पक्षाचे वक्ता प्रशिक्षण जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीने काढलेल्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजी, संघर्षाची प्रचिती आली.
स्थानिक आजी-माजी पदाधिकाºयांकडून सहकार्य मिळत नसल्याने व्यथित झालेले पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी पदाचा राजीनामा थेट पवारांसह प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला होता. परिवर्तन सभेत अपेक्षित गर्दी जमवू शकलो नाही, हे प्रमुख कारण त्यांनी राजीनामापत्रात दिले होते. परंतू पक्षातील प्रस्थापित स्थानिक धनदांडग्यांकडून त्रास होत असल्याचेही हनुमंते यांनी म्हटले होते. परंतू हा राजीनामा पक्षाचे सर्वेसर्वा पवारांनी फेटाळला. दरम्यान, सोमवारी वर्धापनदिनी पाणी परिषदेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातही हनुमंते यांनाच नायर यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. याचे पडसाद पवारांनी बोलाविलेल्या जिल्हानिहाय बैठकीत उमटणार असल्याची सूत्रांची माहीती आहे. पडसाद उमटले तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या बैठकीत पवार कोणते डोस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.तोडग्याकडे लागले सगळ्यांचे लक्षप्रदेश कार्यालयात तीन दिवस चालणाºया जिल्हानिहाय बैठकीत गुरुवारी मुंबईसह वसई-विरार, पालघर, रत्नागिरी, पनवेल शहर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे शहर आणि ग्रामीण, मीरा भार्इंदर, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबईसह कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील पदाधिकाºयांना बोलाविण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीची बैठक साधारण सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत प्रमुख चिंतन बैठक पक्षाच्या वतीने पार पडली. परंतु जिल्हानिहाय बैठकीत पवार स्थानिक पातळीवर सुरू असलेली गटबाजी, वाद यात भाष्य करतात का? त्यावर तोडगा काढतात का? याकडे लक्ष लागले आहे.