मुंबई - राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून शरद पवारांनी बंदोबस्तावेळी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली आहे.
या पत्रात शरद पवार म्हणाले की, जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात असं ते म्हणाले.
सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही. त्यामुळे सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात अशी मागणी शरद पवारांनी पत्रात केली आहे.
त्याचसोबत पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, अशी विनंती करणारे पत्र मी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवले आहे. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. एकीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा केला असताना राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे. पोलिसांवरील कामाचा ताण वाढत असल्याने अनेकदा पोलिसांच्या मृत्यूच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावर गृहमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.