Sharad Pawar: राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याचा अभिमान, पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:28 PM2022-07-12T20:28:28+5:302022-07-12T20:45:54+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली
मुंबई - संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजुला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली तर ती एका हातात जाते ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी, राज्यातील सत्तातरावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा अभिमान वाटतो असे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन केले. यावेळी, शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 'पक्षाची लाईन घेऊन काम करा. हे सांगतानाच कामाची जबाबदारी विकेंद्रीकरणाप्रमाणे करुया. प्रत्येक जिल्ह्यात काय काम करायचं आहे. इतर पक्षांमध्ये फाटाफूट झाली परंतु राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याबद्दल शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले.
याचपद्धतीने महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक न्याय आणि ओबीसी विभागाने देखील काम करावे. मुंबईतही प्रभावीपणे काम करावे. हे सर्व उत्तमरीत्या झाले तर चित्र नक्कीच बदलेल. राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 12, 2022
तरुण पिढीच्या पाठीशी उभे राहा
आगामी नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकात नेतृत्वाची फळी तयार करण्याची व सर्व घटकांना न्याय कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. यावेळी ५० टक्के नवीन तरुण पिढी घ्या त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहा हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. आगामी निवडणूका कशा लढणार आहोत याचा निर्णय पक्ष नक्की घेईल. पक्षाने निर्णय घेतला की तिकडे सगळं लक्ष केंद्रीत करावं लागेल. आपले ५४ आमदार आणि शिवसेनेचे ५६ तर काँग्रेसचे ४४ अशी परिस्थिती होती. आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला कसा जाईल असा प्रयत्न करुया असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
काँग्रेसकडून ईडीचा वापर कधीच झाला नाही
केंद्रातील सरकार केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र, आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे असेही शरद पवार म्हणाले.