मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याचा निधी वाडिया रूग्णालयाला द्यावा, त्याऐवजी जेएनयूसारखे एखादे विद्यापीठ उभारावे अशी मागणी करणाऱ्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेतला.शिवस्मारक किंवा बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचे कामे एकदाच केले जाते. ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ पाहायला जगभरातून लोक अमेरिकेत जातात. अशा दर्जाची स्मारके उभी राहत असतात तेव्हा काटकसर करायची नसते. बाकी वाडीयाला निधी किंवा आणखी एखादे विद्यापीठ उभारण्याची महाराष्ट्राची ताकद नक्कीच आहे, त्याची फारशी चिंता करायची गरज नाही; अशा शब्दात पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.शरद पवार यांनी इंदू मिलला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश गजभिये आदी नेते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी स्मारकाचा निधी आणि पुतळ्यावरून सल्ले देणाऱ्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. देशात स्वातंत्र्य आहे. मुक्तपणे बोलण्याचे कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे समाजात कोणताही विषय आला की आपण मार्गदर्शन केलेच पाहिजे, असे वाटणारा मोठा वर्ग देशात आहे. त्यामुळे योग्य असेल ते घ्यायचे, नसेल ते सोडून आपण काम करत राहायचे, असा टोला पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता हाणला.चैत्यभूमी आणि त्याच्या शेजारी भव्य स्मारक यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने हे एक महत्वाचे आकर्षण ठरेल. ज्यांनी या देशाला घटना दिली त्या महामानवाच्या दर्शनासाठी देशभरातून नागारिक इथे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याशिवाय, श्रीलंका, थायलंडपासून थेट चीनपर्यंत जिथे जिथे बौद्ध समाज आहे तिथून पर्यटक हे स्मारक पाहायला मुंबईत येथील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.‘...तर, दोन वर्षांत काम पूर्ण होईल’स्मारकाचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून ७४ टक्के काम बाकी असल्याची माहिती मला देण्यात आली.स्मारकाचे काम शापूरजी पालनजीसारख्या अग्रगण्य संस्थेला देण्यात आले आहे. या कामात काही अडचणी आल्या नाहीत, सर्व परवानग्या मिळाल्या तर दोन वर्षात स्मारक पूर्ण व्हायला हरकत नाही. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी हे काम एक आव्हान समजून स्वीकारायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.
स्मारकांच्या कामात काटकसर नको, शरद पवारांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:50 AM