Join us

खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 6:41 PM

सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.

मुंबई - नवी मुंबईतील खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू झाल्याने विरोधक संतप्त झाले आहेत. याप्रकरणी, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली समिती नेमावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर, खारघर घटना ही शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे, अशा शब्दात काँग्रेसने सरकारला लक्ष्य केलं आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही खारघर घटनेवरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.  

सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या घटनेतील सत्य जनतेसमोर यावे यासाठी काँग्रेस पक्ष दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषद घेणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. तर, शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना राज्य सरकारला लक्ष्य केलं. खारघर दुर्घटनेवरुन पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

खारघर मृत्यूप्रकरणातील घटनेची निवृ्त्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच खारघर दुर्घटनेची जबाबदारी सरकारची असल्याची टिका देखील शरद पवार यांनी केली. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात बोलत नाही, त्यामुळे खारघर घटनेची  न्यायाधीशांकडून चौकशी करा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

खारघर घटनेत जास्त लोकं दगावल्याचा काँग्रेसचा आरोप

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, खारघरमधील घटनेत १४ लोकांचे मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी आहे परंतु ही संख्या जास्त आहे सरकार मात्र मृतांची खरी संख्या बाहेर येऊ देत नाही. शिंदे सरकार या घटनतील सत्य लपवत आहे. ५०० पेक्षा जास्त लोक उपचार घेत आहेत ही संख्या सुद्धा जास्त आहे पण सरकार वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ देत नाही. खारघरमधील १४ बळींच्या घटनेवर शिंदे सरकार मूग गिळून गप्प असले तरी आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. भाजपाप्रणित शिंदे सरकारला खारघर प्रकरणी सत्य सांगावेच लागेल.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारनवी मुंबईअंमलबजावणी संचालनालय