Join us  

Sharad Pawar: शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् संजय राऊतांनी सांगितली 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 1:56 PM

शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून पवारांच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. तसेच, तुमच्या नेतृत्त्वाशिवाय पक्ष नाही, असे म्हणत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. आता, महाविकास आघाडीतील शरद पवारांचे सर्वात जवळचे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी यावेळी तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि पक्ष आहे, अशी भावना व्यक्त केली. आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. तर, प्रफुल्ल पटेल यांनीही, या निर्णयाची कल्पना नव्हती, असे म्हटले आहे. आता, संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे. 

गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे... पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत... असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवार हेही आपला निर्णय मागे घेतील, असे त्यांनी सूचवलं आहे. 

साहेबांनी विश्वासात न घेता निर्णय घेतला

पवार साहेबांच्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय ज्वलंत झाल्या आहेत. तुम्ही जसे स्तब्ध झाला, तसेच आम्हीदेखील आहोत. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. तुमच्यासारखीच भावना आमचीही आहे. तुमच्या वतीने आम्हीही साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेससंजय राऊतशिवसेना