पवारांची NCP'च्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा; सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 07:37 PM2023-05-02T19:37:41+5:302023-05-02T19:47:14+5:30
आज खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा केली.
मुंबई- आज खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली, या निर्णयावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.
शरदा पवार यांच्या राजीनाम्यावर राज्यातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले, काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. यावर सुषमा अंधारे यांनीही पत्र लिहिले आहे.
सुषमा अंधारे यांच्या पत्रात काय आहे?
'खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्यही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही, असं या पत्रात म्हटले आहे.
सर , बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज आहे ते उद्या राहीलच असे नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे. सर, कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील ही पण सर , माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत.
कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले. सर, एकीकडे ना. धो. महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला.
शेतीच्या सातबारावर घरातल्या पुरुषाइतकेच माय माऊलीचे सुद्धा नाव असले पाहिजे हा क्रांतिकारी निर्णयसुद्धा आपल्याच काळातला ! सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते . एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे.
'शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही. पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे एकूणच महाराष्ट्र आणि देशाज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे, अशी मागणी या पत्रात केली आहे.