मुंबई - राजधानी दिल्लीत आज आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला आज हिंसक वळण लागले आहे. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज घडलेल्या घटनेवर देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. पंजाबला पुन्हा एकदा अस्थिर करण्याचे पातक केंद्र सरकारने करू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही. मात्र या घटनेमागच्या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने बसलेले शेतकरी आज संतप्त झाले आहे. केंद्र सरकारने आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावल्या नाहीत. केंद्र सरकारने परिपक्वपणे आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती, असे शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना न दुखावता सरकारने सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. बळाचा वापर करून काहीही सिद्ध होणार नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे लागू करताना सविस्तर चर्चा करायला हवी होती. मात्र दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.