शरद पवार यांची प्रकृती एंडोस्कोपीनंतर उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:12 AM2021-04-01T07:12:07+5:302021-04-01T07:12:44+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी पहाटे एंडोस्कोपी करण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांच्या पित्तनलिकेतील खडा बाहेर काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी पहाटे एंडोस्कोपी करण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांच्या पित्तनलिकेतील खडा बाहेर काढण्यात आला. पित्ताशयात देखील खडे असून त्यावर शस्त्रक्रिया कधी करायची याचा निर्णय येत्या ८ ते १५ दिवसात घेण्यात येईल, अशी माहिती डॉ. अमित मायदेव यांनी दिली.
शरद पवार यांना मंगळवारी अचानक पोटात दुखू लागले म्हणून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला. त्यामुळे बुधवारी पहाटे एंडोस्कोपीच्या साहाय्याने तो खडा दूर करण्यात आला. त्यांची प्रकृती आता उत्तम असून ते उपचारांना साथ देत आहेत, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
खासदार पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या टीममध्ये डॉ. प्रतित समदानी, डॉ. सुलतान प्रधान तसेच डॉ. शहारुख गोलवाला, डॉ दप्तरी, डॉ. टिबडिवाला यांचा समावेश आहे. रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह नातेवाईक आणि अन्य नेते उपस्थित होते. खा. पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत उपचार करणाऱ्याा डॉक्टरांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.