शरद पवारांनी घातला होता दाऊदच्या शरणागतीत खोडा - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:49 AM2019-03-20T06:49:14+5:302019-03-20T06:49:41+5:30

शिक्षा सुनवा, जेलमध्ये टाका. फक्त पोलिसांची थर्ड डिग्री लावू नका, या एकाच अटीवर दाऊद इब्राहिम भारतास शरण यायला तयार होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला.

Sharad Pawar's darshan was in the surrender of Dawood - Prakash Ambedkar | शरद पवारांनी घातला होता दाऊदच्या शरणागतीत खोडा - प्रकाश आंबेडकर

शरद पवारांनी घातला होता दाऊदच्या शरणागतीत खोडा - प्रकाश आंबेडकर

Next

मुंबई - शिक्षा सुनवा, जेलमध्ये टाका. फक्त पोलिसांची थर्ड डिग्री लावू नका, या एकाच अटीवर दाऊद इब्राहिम भारतास शरण यायला तयार होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे आज दाऊदसाठी भारताला पाकिस्तानकडे भीक मागावी लागत आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला. आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुंबईतील बॉम्बस्फोटांसह विविध गुन्ह्यांतील आरोपी दाऊद इब्राहिम स्वत:च भारतास शरण येण्यास तयार होता. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांना ९३ साली लंडन येथे दाऊदने तसा प्रस्ताव दिला होता. जेठमलानी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना याबाबत कळविले होते. त्यानंतर शरद पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान, केंद्र सरकार अथवा संबंधित सुरक्षा यंत्रणांना ही माहिती द्यायला हवी होती. यातील काहीच न करता पवार यांनी स्वत:च हा प्रस्ताव धुडकावून लावला. या सर्व प्रकाराबाबत खुलासा होणे आवश्यक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शरद पवार यांनी स्वत:च्या पातळीवर दाऊदचा प्रस्ताव का नाकारला हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीने ईशान्य मुंबईतील आपला उमेदवार मागे घेतला. संभाजी काशिदांना उमेदवारी देण्यात आली होती. काशिदांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती दडवली होती. जिल्हा कमिटीकडून पडताळणीत चूक झाली. लवकरच ईशान्य मुंबईसह उर्वरित ११ जागांचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे आंबेडकर यांनी सांगितले.
भाजपाला मदत करण्यासाठी चर्चा - राष्ट्रवादी
भाजपाला मदत करण्याच्या उद्देशाने २५ वर्षांनंतर दाऊदची चर्चा केली जात आहे. फरार आरोपी शर्तींवर शरण येऊ शकत नाही. राम जेठमलानी ज्या अटी सांगत होते त्या सरकारला मान्य नव्हत्या. शरद पवार यांनी वेळोवेळी याबाबत खुलासा केला आहे. आता तर राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. मग, दाऊदला का आणले नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांनी हसे करून घेऊनये - आव्हाड


ठाणे : आम्हीही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाकडून १०० कोटी रुपये घेतले, असा आरोप करू शकतो, पण पुराव्यांशिवाय आम्ही तो करीत नाही. प्रकाश आंबेडकर यांनीही हे ध्यानात ठेवावे की, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहात. उगाच दिवसभराच्या चर्चेसाठी हा वारसा कलंकित करू नका. कारण आम्हीही बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहोत. त्यामुळे खोटे आरोप करणे वैचारिक वारस कधीच स्वीकारत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
दाऊदला भारतात आणण्याचा प्रस्ताव जेव्हा आला, त्या वेळी दाऊदने काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एक अट होती की, त्याला पोलिसी खाक्या दाखवायचा नाही आणि त्याच्या घरातच नजरकैदेत ठेवायचे. त्याच्या या दोन्ही अटी पवार यांनी फेटाळून लावल्या. पोलीस दलासमोर जेव्हा हा प्रस्ताव मांडला, त्या वेळीही विरोधच करण्यात आला. पवार यांनी त्या वेळी उलटा निरोप पाठविला की, ‘भारताचे कायदे मान्य असतील, तर आधी शरणागती पत्करायची, नंतर पुढचे-पुढे बघू,’ या निरोपानंतर दाऊद कराचीला परागंदा झाला. तो आजतागायत कोणाला दिसलाच नाही, असे आव्हाड म्हणाले.

Web Title: Sharad Pawar's darshan was in the surrender of Dawood - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.