मुंबई - आमदार अपात्रता आणि सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. सुरुवातीलाच, अगोदर खरी शिवसेना कोणाची हे मी सांगेन, कोणाचा पक्ष खरा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून मला असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. भरत गोगावले यांचा व्हीप खरा मानण्यात आला असून सुनिल प्रभू यांचा व्हीप अध्यक्षांनी नाकारला आहे. तर, अध्यक्षांनी सर्वच आमदारांना पात्र ठरवले आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.
विधानसभा अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कोणाची हा निर्णय दिला. त्यानंतर, आमदार अपात्रेबाबतही निर्णय जाहीर केला. त्यानुसार, सर्वच आमदारांना पात्र ठारलं आहे. त्यामुळे, कोणीही आमदार अपात्र झाला नाही. या निकालावार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, अप्रत्यक्षपणे त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला.
''सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं, त्यानुसारच हा निर्णय आला आहे. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल,'' असे शरद पवार यांनी म्हटलं. व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिलं. तर, व्हीप देण्याबाबात पक्ष संघटना महत्त्वाची, असं कोर्टाने म्हटले होतं. त्यामुळे, येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत. आता, ठाकरेंना कोर्टात जावं लागेल, असेही शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र, हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यातच विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
ठाकरे गट आक्रमक, शिंदे गटात जल्लोष
विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर, शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शिंदेचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येणार नाही, असेही म्हटले. अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. आता, आमदार अपात्रतेसंदर्भातही निर्णय जाहीर केला. त्यानुसार, दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले असून कोणीही आमदार अपात्र असणार नाही. त्यामुळे, कुठल्याही आमदाराची आमदारकी जाणार नाही. दरम्यान, निकालाची प्रत सर्वांना दिली जाणार असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले.