Mpsc च्या प्रश्नावर शरद पवारांची नौटंकी, राष्ट्रवादीप्रमुखावर भाजपचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:31 AM2023-02-22T11:31:54+5:302023-02-22T11:32:06+5:30
वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला.
मुंबई/पुणे - एमपीएससीने नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करावी या मागणीसाठी २० फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तिसऱ्यादिवशीही सुरूच आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांनी सोमवारआणि मंगळवारची रात्र थंडीत जागून काढली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रात्री ११.०० वाजता आंदोलनास्थळाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावरुन, आता विरोधी पक्षाकडून पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. शरद पवार यांनी रात्री अचानक विद्यार्थ्यांशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्यापही आंदोलन सुरूच आहे. मात्र, शरद पवारांच्या भेटीमुळे ह्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांची ही नौंटकी असल्याचं म्हटलंय.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात निर्माण झाला, तेव्हा ह्यांनी लक्ष दिलं नाही. आता, केवळ विरोधासाठी विरोध, राजकारण करण्यासाठी विरोध, हा नौटंकी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, शिक्षकांचे प्रश्न होते, तेव्हा लक्ष घालायला वेळ मिळाला नाही. पण, आता ही नौटंकी सुरू आहे. या वयात पवार साहेबांना ही नौटंकी योग्य ठरेल अस वाटत नाही, असे प्रविण दरेकर यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकार गांभीर्याने या विषयांत लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देईल, असेही दरेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसोबत बैठकीला येणार - पवार
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या कुलगुरूंनी मला पत्र पाठवून त्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या योग्य असल्याचे सांगितले आहे. अशक्य काही नाही आपण मार्ग काढू शकतो. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार आणि मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणे गरजेचे आहे. इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी संपर्क केला असता बैठक घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मी स्वतः तुमच्याबरोबर असेन. आयोगाचे अधिकारी, विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी या बैठकीला असतील. तुमच्यावतीने कोण बैठकीला येणार त्यांची नावे द्यावीत, असे शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितले.