Join us

राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा मिश्कील टोला, पत्रकारांमध्ये हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 5:41 PM

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आज दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांचाही समावेश असल्यामुळे, हे बंड शरद पवारांच्या मर्जीनेच झाले का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या दरम्यान, शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या बंडावर प्रतिक्रिया दिली. या बंडास आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, आपण उद्यापासून लोकांमध्ये जाणार, पुन्हा नवे नेतृत्व घडवणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. यावेळी, मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या टीकेलाही पवारांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं. 

'आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असं ट्विट करत राज ठाकरेंनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. आता, अजित पवारांच्या भूमिकेवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, राज ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही मिश्कीलपणे उत्तर दिले. 

आमच्याकडे शिल्लक कोण आहेत. ते तर बघून द्या, असे म्हणत राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांनी मिश्कील टोला लगावला. त्यावेळी, पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. ज्यांना जायचंय ते थांबणार नाहीत, ज्यांना जायचं नाही ते थांबलेत, असंही शरद पवार यांनी म्हटलं. दुसरी टीम आणि तिसरी टीम हा विषयच राहत नाही. उद्या जेव्हा निवडणुकात होतील, तेव्हा तुम्हाला आमची नवीन टीम उभी राहिलेली दिसेल, असेही शरद पवार यांनी म्हटले. 

पवारांनी सांगितली १९८० ची आठवण

हा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो. तेव्हा त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. सहाजणच राहिले होते. मी त्या पाच लोकांचा नेता राहिलो होतो. पाच लोकांसोबत मी पुन्हा पक्ष बांधण्यासाठी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुढची जी निवडणूक झाली ती आमची संख्या ७९ वर गेली. संख्या नुसतीच वाढली नाही, तर जे पक्ष सोडून गेलेले. त्यापैकी तीन ते चार सोडले तर सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहिल. माझा राज्यातील जनतेवर प्रचंड विश्वास आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत असेच चित्र होते. आमची भूमिका महाराष्ट्रभर जाऊन मांडली म्हणून एवढे आमदार निवडून आले होते, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारमुंबईराज ठाकरेमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष