राज्यात राष्ट्रपती राजवटची कल्पना शरद पवार यांचीच; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:57 AM2023-10-05T05:57:24+5:302023-10-05T05:57:42+5:30
पुन्हा आमचे सरकार आणणार
मुंबई : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांचीच होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला धोका देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. आम्हाला तीन पक्षाचे सरकार नको आहे, आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा हा प्रस्ताव होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने गोंधळाची परिस्थिती होती. कोणत्याही पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा होत नसल्याने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केली. मात्र, भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यानंतर काही दिवसात अजित पवार माघारी फिरले. राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी शरद पवार यांनी ही खेळी खेळल्याची चर्चा होती. यावर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू करण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांना सरकार बनविण्यासाठी आमंत्रण दिले जाते. त्यांना तसे पत्र दिले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसलाही पत्र देण्यात आले होते. त्यावेळी आम्ही सरकार बनवणार नाही, असे राष्ट्रवादीचे पत्र माझ्या घरी टाईप केले होते. शरद पवार यांनी या पत्रात दुरुस्ती केली होती.
तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता
दिल्लीत की महाराष्ट्रात राहणार, यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, याबाबत जी पतंगबाजी चालत आहे, त्यात काही सत्य नाही. माझ्या पक्षाने महाराष्ट्रात माझे नेतृत्व तयार केले आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राचा नेता आहे.
जोपर्यंत पक्ष दुसरा नेता तयार करत नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता असेन. मला जेवढे राजकारण कळते त्यावरून मला दिल्लीत बोलावले जाईल, असे वाटत नाही.
त्यामुळे महाराष्ट्रात काम करेन आणि पुन्हा आमचे सरकार निवडून आणेन, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘...आणि शरद पवारांनी निर्णय फिरवला’
शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर टाकण्यात आली. आम्ही मंत्र्यांच्या खात्यांची यादी तयार केली. जिल्ह्यांपासूनच्या सर्व गोष्टी ठरवल्या. या प्रक्रियेच्या काळातच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे ठरले. त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली, पण त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा निर्णय बदलला. हे योग्य नसल्याचे अजित पवार यांना वाटले. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला होता, असे फडणवीस म्हणाले.