मुंबई: बारामतीत उद्या (शनिवारी) 'नमो' रोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी भोजनाचे खास आमंत्रण दिले आहे
शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणाची राज्यभर चर्चा सुरु आहे. तसेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आमंत्रण स्वीकारुन शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार का?, हे उद्याच स्पष्ट होईल. याचदरम्यान भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत शरद पवारांच्या या आमंत्रणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले, म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आले आहे. याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण...मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा वारंवार ही परंपरा जतन करीत आले आहेत, असं आशिष शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्षे जतन करीत आली आहेत. फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली. त्यांचा नारा एकच..मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी...पेग, पेग्वीन, पार्टीसाठी कमला मिल बरी, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.
शरद पवारांनी पत्रात काय म्हटले?
आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविदबाग' ह्या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणांस दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंड- ळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचादेखील स्वीकार करावा, असे शरद पवारांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.