Join us  

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची आज सभा; राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 7:23 AM

शनिवारी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून शरद पवार नाशिकच्या दिशेने निघतील.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शनिवार, ८ जुलै रोजी नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार आहेत. पक्ष सोडून गेलेल्या छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच पवारांची ही पहिली सभा असल्याने या सभेला कसा प्रतिसाद मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. 

शनिवारी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून शरद पवार नाशिकच्या दिशेने निघतील. रस्त्यात ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी या मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करणार आहेत. नाशिकच्या सभेनंतर पवार धुळे आणि जळगावचा दौरा करणार आहेत. मात्र, पावसाचा अंदाज घेऊन हा दौरा लवकरच जाहीर केलाजाणार आहे.

येवल्यात सभेची जय्यत तयारी

येवला  येथील बाजार समितीच्या बंदिस्त शेडमध्ये सभेसाठी व्यासपीठ उभारणी करण्यात आली आहे. १५० बाय २०० फूट आकार असलेल्या या शेडमध्ये चार फूट उंचीचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पत्र्याचे शेड असल्याने  पावसातही सभा घेता येणार आहे.   ५ हजार लोक बसू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. भुजबळ यांचे कट्टर विरोधक ॲड. माणिकराव शिंदे यांनी या सभेच्या नियाेजनासाठी पुढाकार घेतला आहे. 

भुजबळांचे कार्यकर्ते नाशिकला भुजबळ समर्थकांना मात्र शनिवारी नाशिकला बोलावणे धाडण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ यांच्याकडूनही शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शरद पवारछगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस