पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट
By यदू जोशी | Published: July 16, 2024 05:34 AM2024-07-16T05:34:36+5:302024-07-16T05:36:23+5:30
ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
यदु जोशी
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर जाहीर भूमिका घेण्यास बाध्य करण्याची खेळी महायुतीने आखली असल्याचे स्पष्ट संकेत मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीने दिले आहेत. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. मात्र, काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गटाने बहिष्कार टाकला होता. दुसऱ्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्तारूढ आमदारांनी हल्लाबोल करत या बहिष्कारावरून विरोधकांना सवाल केले होते. तसेच, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची नावे न घेता महाविकास आघाडीची आरक्षणाबाबत भूमिका काय हे सभागृहाला सांगा, असे आव्हान दिले होते.
यावर मविआच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना ओबीसींतून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली नव्हती. आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे तेव्हा सरकारनेच भूमिका घेणे गरजेचे आहे, असे म्हणत चेंडू सरकारच्या कोर्टात टाकला होता. या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सोमवारी भेट घेतली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावात मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण झाला असून स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे, राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून आपण जबाबदारी घेऊन मराठा- ओबीसी वादात मध्यस्थी करून राज्यात शांताता निर्माण करावी, अशी विनंती करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतल्याचे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. सोमवारी सकाळी अचानक शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली. पण, भेटीसाठी त्यांना दीड तास प्रतीक्षा करावी लागली.
भुजबळ यांच्यामुळेच स्फोटक परिस्थिती : मनोज जरांगे-पाटील
राज्यात स्फोटक परिस्थिती छगन भुजबळ यांनीच तयार केली. ओबीसी नेत्यांना हाताशी धरून कत्ते आणि कोयत्याची भाषा त्यांनीच केली. आजपर्यंत शरद पवारांवर टीका करणारा माणूस अचानक शरद पवार यांना भेटायला कसा जातो, असा सवाल करत हा सरकारचा डाव आहे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.
भूमिका मांडण्यासाठी मविआच्या नेत्यांवर दबावाची रणनीती
आरक्षणावर महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मोठा फटका महायुतीला बसलेला होता. तेव्हा आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर या मुद्द्यावर भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणावा, असा सूर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुजबळ हे सोमवारी शरद पवार यांना भेटले. असे म्हटले जाते.