मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यांनी २९-२ने धनंजय शिंदे यांचा पराभव केला. एकूण ३४ जणांपैकी २९ मतदारांनी निवडणुकीसाठी मतदान केले. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तयार झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत एकूण ३४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यापैकी ३१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फक्त दोन मते शिंदे यांना मिळाली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीवेळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, ही साखर कारखाने किंवा बँकेची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेमध्ये गैरप्रकार सुरू असून, याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कार्यकारिणीमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत सात उपाध्यक्ष निवडले गेले आहेत. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण, नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा समावेश आहे. कार्यकारी मंडळाच्या १५ जागांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली.
आरोप-प्रत्यारोपमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक म्हणजे कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आताचे कार्यकारी मंडळ अनधिकृत आहे. ते निवडणुका न घेता झालेले आहे. ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक एक फार्स आहे. खरे तर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीवर डोळा ठेवून महाविकास आघाडीच्या लोकांनी निवडणूक घेतली, असे देशपांडे म्हणाले.तर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उमेदवार विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहेत. पवारांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते हे काही जणांना माहीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बाबत केलेल्या आरोपाला उत्तर दिले जाईल, असे त्या म्हणाल्या.