अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:46 PM2024-03-07T13:46:53+5:302024-03-07T13:47:59+5:30
खासदार शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रणशिंग फुंकलं असून प्रचार सभांना सुरुवात केली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे, भाजपचीही जोरदार तयारी सुरू असून भाजपमधील दिग्गज नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांवर टीका केली. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसला घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं. "शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय", अशीही टीका शाह यांनी केली, या टीकेला आता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच पवारस्टाईलने उत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या या पटलवारानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
खासदार शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रणशिंग फुंकलं असून प्रचार सभांना सुरुवात केली आहे. मावळमध्ये शरद पवार यांची सभा झाली, त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी टीका केली. तर, अमित शाहंच्या टीकेला पवारस्टाईल प्रत्युत्तरही दिले.
''केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. याठिकाणी भाषण करताना त्यांनी म्हटलं की, ५० वर्षे शरद पवार महाराष्ट्रावर बसले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, कारण मला ५० वर्षे लोकांनी निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं, असे म्हणत शरद पवारांनी पवारस्टाईल उत्तर दिलं. पहिल्यांदा आमदार, नंतर खासदार, नंतर मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, राज्यसभा हा सगळा काळ पाहिला असता ५६ वर्षे आहे. देशाच्या संसदेत एक माणूस सतत ५६ वर्षे कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे. कारण, मला तुमची साथ आहे.'', असे शरद पवार म्हणाले. यावेळी, त्यांनी राजकीय इतिहास सांगत मावळवासीयांना गांधी-नेहरुंच्या विचारांची आठवणही करुन दिली.
एकीकडे गांधी-नेहरुंचा विचार, दुसऱ्या बाजुला जनसंघाचा विचार होता, असे म्हणत शरद पवारांनी राजकीय इतिहास सांगितला. तसेच, हा मतदारसंघ भाजपाच्या विचारातून काढून घेत आपण मावळ मतदारसंघात गांधी-नेहरुंचा विचार रुजवला, असं शरद पवार यांनी म्हटले.
जयंत पाटलांनीही दिलं उत्तर
"५० वर्ष महाराष्ट्राला शरद पवार यांचे एक स्वप्न, एक तरुण शुन्यातून जग निर्माण करणारा ते इथंपर्यंतचा प्रवास महाराष्ट्राने त्यांचा बघितला. महाराष्ट्राने त्यांना साथ दिली. सहन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवला नाही, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केले म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या टीकेला दिले.