Join us

पहाटेच्या शपथविधीवरुन कोश्यारी स्पष्टच बोलले, शरद पवारांना दाखवलं 'लवासा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:51 AM

पहाटेचा शपथविधी देणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच केलेल्या खटाटोपावर प्रत्युत्तर दिलंय. 

मुंबई - राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वात चर्चेता विषय ठरलेला पहाटेचा शपथविधीचं कोडं अद्यापही उलगडलं नाही. अजित पवार यांच्यासोबतचा शपथविधी शरद पवार यांच्या परवानगीनेच झाला असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरुन पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला. त्यासंदर्भात शरद पवार यांनी स्पष्टीकरणही दिलं. देवेंद्र फडणवीस हे असत्याचा आधार घेऊन बोलत असल्याचं ते म्हणाले. तर, राष्ट्रपती राजवटीबाबतही त्यांनी भाष्य केलं होतं. आता, यासंदर्भात पहाटेचा शपथविधी देणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच केलेल्या खटाटोपावर प्रत्युत्तर दिलंय. 

ज्या पद्धतीने पहाटेचा शपथविधी झाला. जर अशारितीने शपथविधी झाला नसता, तर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली नसती, असं शरद पवारांचं म्हणणं आहे, यासंदर्भात भगतसिंह कोश्यारींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, माजी राज्यपालांनी शरद पवारांसारख्या बड्या नेत्यांनी जर-तर वर भाष्य करणे योग्य नसल्याचं म्हटलं. तसेच, मग शरद पवारांनी कोर्टात जे लवासाचं प्रकरण आहे. त्यावर दहा वेळा विचार करायला हवा. कोर्टाने काय म्हटलं आहे त्याबद्दल. ते इतके मोठे व्यक्ती आहेत. त्यांचा मी सन्मान करतो. माझ्या हस्ते त्यांना दोन वेळा डी. लिट पदवी दिली गेली. मी त्यांचा आदर करतो. ते जर असं बोलत असतील, तर ते राजकीय बोलत आहेत, असे उत्तर भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. कोश्यारी हे राज्यपाल पदावरुन पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले. त्यामध्ये, मुंबई तकशी बोलताना त्यांनी रात्रीच्या शपथविधीवर परखडपणे मत मांडले. 

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर काय म्हणाले शरद पवार

'देवेंद्र फडणवीस हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे तरीही असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर ते बोलले मला माहीत नाही.' असं म्हणतत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या विषयावरुन पुन्हा एकदा फडणवीस आणि पवारांमध्ये राजकीय वादंग निर्माण झालं होतं. दरम्यान, आतापर्यंत शरद पवारांनी अनेकदा सांगितलं आहे की, अजित पवारांनी रागाच्या भरात भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. ती त्यांची चूक होती. त्याला आमचा कधीही पाठिंबा नव्हता. त्यांना त्यांची चूक कळली तेव्हा ते माघारी आले. त्यामुळे त्या शपथविधीशी आपला काहीही संबंध नव्हता. 

टॅग्स :शरद पवारभगत सिंह कोश्यारीअजित पवारदेवेंद्र फडणवीस