Join us

'शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते'; एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:06 AM

कोणाचा उघडपणे पाठिंबा होता, तर काही जणांचा मनापासून पाठिंबा होता, असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं. 

मुंबई- एमसीए निवडणूक वेगळी असून आम्ही खेळामध्ये कधीही राजकारण आणत नाही. मुंबईतील क्रिकेटमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार-आशिष शेलार गटाने बुधवारी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. 

पवार आणि शेलार पॅनलने बई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ही डिनर पार्टी केली. यावेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील टोले लगावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावण्याचा मोह आवरला नाही. आज शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच मंचावर आलो आहेत. थोडी-थोडी बॅटिंग आम्हालाही येते. ३ महिन्यांपूर्वी देखील आम्ही बॅटिंग केली होती, असा मिश्किल टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. 

आम्हाला एकत्र बघून काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही जणांची झोप उडू शकते, असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. आम्ही सगळ्यांच्या आर्शिवादाने ती मॅच जिंकलीय. कोणाचा उघडपणे पाठिंबा होता, तर काही जणांचा मनापासून पाठिंबा होता, असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही निवडणूक लढवत असून पवार आणि शेलार यांनी स्थापन केलेल्या पॅनलमधून उमेदवारी दाखल केली आहे. प्रतिष्ठेच्या निवडणूकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे नेते एकत्र येऊन एकाच पवार-शेलार गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीवर सर्वांचेच लक्ष लागलं आहे. 

माझे सासरेही शिंदेच- शरद पवार

माझे सासरेही शिंदेच आहेत. त्यामुळे शिंदेंच्या मुलीची काळजी पवारच घेऊ शकतात, असं मिश्किल विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या या विधानानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थितांमध्ये हसा पिकला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशरद पवारदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरे