काँग्रेसला वगळून आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना शरद पवार यांची साथ - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 05:52 AM2021-12-03T05:52:04+5:302021-12-03T05:53:09+5:30
काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई - काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात काही भेटीगाठी घेतल्या. उद्योगांना आकृष्ट करणे हा ममता बॅनर्जी यांचा बहाणा आहे. या दौऱ्याचा मूळ अजेंडा राजकीय होता. भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचे, असे म्हणत असताना शरद पवार अंडरलाईन स्टेटमेंट करतात. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या, असे म्हणायचे असते. ममता बॅनर्जी या थेट बोलणाऱ्या आहेत तर पवार हे ‘बिटवीन द लाईन’ बोलणारे आहेत. दोघांचे बोलणे एकच आहे. दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवत इतरांना सोबत घ्यायचे आहे. ममता बॅनर्जी गोव्यात आणि पूर्वोत्तर राज्यात निवडणुका लढवत आहेत. काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष नाही तर आम्ही आहोत, हे त्यांना सांगायचे आहे. काँग्रसे संपली आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत, ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. या सर्व मतांना पवारांचे समर्थन आहे. पहिल्या दिवसापासून हे पवारांचे मत आहे. फक्त राज्यातील परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळेच ते काँग्रेससोबत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
ममता बॅनर्जी, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत फडणवीस म्हणाले की, कितीही गुप्त भेटी घेतल्या तरी २०२४ ला मोदींच्या नेतृत्वातच सरकार येणार आहे. मी जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात उद्योजकांशी चर्चा करायला यायचे. मग तो काँग्रेसचा असो की भाजपचा. त्या सर्वांचे आम्ही स्वागत केले. इथे ममता बॅनर्जी आल्या की स्वागत होते आणि अन्य भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री आल्यावर टीका होते. ही दुटप्पी भूमिका आहे, असे फडणवीस म्हणाले.