मुंबई - मराठीतले ज्येष्ठ साहित्यित शरणकुमार लिंबाळे यांना 2020 या वर्षीचा सरस्वती सम्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या 22 भाषातल्या पुस्तकांचे अवलोकन करुन दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान यावर फार काही उल्लेख आढळत नाही. ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केल्याचे लिंबाळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले.
1986 ते 1992 या दरम्यान ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची 40 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून अक्करमाशी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर आणि २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला आहे.