मुंबई : दादर परिसरातील चित्रपटगृहांमधील प्रसिद्ध असलेले शारदा चित्रपटगृह लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. मध्य मुंबई परिसरातील दादर पूर्वेकडील प्रसिद्ध असलेले शारदा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकेकाळी मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचे साक्षीदार असणारे हे चित्रपटगृह जवळपास ४५ वर्षांनी बंद होण्याच्या मार्गावर आहे.कराराची मुदत न वाढविल्यामुळे हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर रोजी हा करार संपला आहे. १९७२ साली हे चित्रपटगृह सुरू झाले होते, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे सध्या चित्रपटगृहाचा ताबा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जुन्या पिढीच्या अनेक आठवणी या चित्रपटगृहाशी जोडलेल्या आहेत. एकेकाळी मराठी चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटगृहाबाहेर रांग लागलेली असायची. भारतमाता आणि शारदा थिएटर त्या वेळी मराठी प्रेक्षकांचे हक्काचे चित्रपटगृह होते. दादरमधल्या मराठी माणसांची तर येथे नेहमी गर्दी असायची. ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी येथे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. ‘रामराम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’ यांसारखे चित्रपट इथे रिलीज झाले. या मराठी चित्रपटांनी इथे सिल्व्हर ज्युबली केली. त्याआधी हे चित्रपटगृह हिंदी सिनेमांसाठी ओळखले जायचे. ‘नमक हराम’, ‘यादों की बारात’, ‘शर्मिली’ यांसारखे हिंदी चित्रपट इथे प्रदर्शित झाले होते.पण काळासोबत चित्रपटगृह मागे पडत गेले, एकीकडे मल्टिप्लेक्सची गर्दी होत असताना, शारदा चित्रपटगृह मात्र आपल्या जुन्या ओळखीतच अडकून होते. गेल्या काही वर्षांपासून तर इथे हिंदी आणि मराठीपेक्षा भोजपुरी चित्रपटच जास्त लागू लागले होते. तिकीट दरही परवडणारे असल्याने उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात चित्रपट पाहायला गर्दी करत होते.