मुंबई : सध्या सर्वत्र आयसीएसई बोर्डाला प्राधान्य दिले जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शाळा अशी ओळख असलेल्या दादर पूर्वेमधील शारदाश्रम ही प्रसिद्ध शाळाही याला अपवाद नाही. येथील इंग्रजी माध्यमाचा राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम बंद करून, तो आयसीएसई बोर्डात रूपांतरित करण्याचा घाट शाळेच्या व्यवस्थापनाने घातला आहे. चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी व्यवस्थापन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या संदर्भात पालकांनी शिक्षण संघटनांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत.शाळेचे व्यवस्थापन शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांकडे ना हरकत प्रमाणपत्र मागत आहेत. मात्र, अनेक पालकांनी आयसीएसई बोर्डात पाल्याला प्रवेश घेऊन देण्यास विरोध दर्शविला आहे. याबाबत बोलताना एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘शाळेने आम्हाला विश्वासात घेतले नाही. आधी पाचवीतून सहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अशी जबरदस्ती करण्यात आली होती. त्या वेळीही आम्ही विरोध केला होता.’दरम्यान शारदाश्रम विद्यामंदिर या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या पहिली ते चौथीच्या १२ वर्ग तुकड्यांना पालिकेने मे २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र शाळेच्या व्यवस्थापनाने प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेचे नवीन नाव ‘एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल’ असे ठेवण्यात येणार आहे.याबाबतचा ठराव शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने फेब्रुवारी २०१७ मध्ये मंजूर केला आहे. त्याचबरोबर शाळेचा लोगोही बदलण्यात येणार आहे. शिक्षण उपसंचालकांनीही माध्यमिक विभागाच्या नव्या नावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्राथमिक विभागाचे नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण समितीच्या येत्या बैठकीत होणार आहे.विश्वस्तांशी चर्चा करणारअनेक पालकांनी युवासेनेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर, युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी मंगळवारी शारदाश्रम व्यवस्थापनाचे प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव यांची पालकांसहभेट घेतली. त्या वेळी नाहरकत प्रमाणपत्र घेतले जात असून, पालकांचा विरोध लक्षात घेता, या संदर्भात आपण विश्वस्तांशी चर्चा करू असे म्हणणे मांडले असल्याचे दुर्गे यांनी सांगितले.आयसीएसई बोर्ड प्रवेशासाठी शाळेकडून दबाव: पालकांचा आरोपपालकांना आपल्या मुलांना राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकवायचे असेल तर शाळा जबरदस्ती करू शकत नाही. त्याचसोबत हे करताना शाळेकडून कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने यामध्ये तत्काळ लक्ष द्यायला हवे.- साईनाथ दुर्गे, कोअर कमिटी सदस्य, युवासेना
सचिनच्या शाळेला आयसीएसई बोर्डाचे वेध, पालकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:53 AM