लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
कोरोनाच्या संकटात कुठलाही संदेश लाईक, शेअर, फॉरवर्ड करण्यापूर्वी आधी तो खरा आहे की खोटा याची ख़ात्री करून घ्या. अन्यथा जेलची हवा खावी लागेल. अफवा पसरविणाऱ्यांंविरोधात राज्याचे महाराष्ट्र सायबर सेल सर्व हालचालींंवर लक्ष ठेवून आहे.
सायबर महाराष्ट्रने व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार सदस्यांनी व्हॉट्सॲप समुहात अफवा, चुकीची माहिती किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत पाठवू नये. त्यासोबत खात्री नसलेले साहित्यही समुहावर पोस्ट करणे टाळावे. अशाप्रकारचे साहित्य समुहात आल्यास ते डीलिट करावे. ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये. याशिवाय एखाद्या समाजाचे किंवा धर्माविरोधातील साहित्य, पॉर्न साहित्य समुहावर पाठवू नये. तर समुहात जबाबदार सदस्य असतील आणि ते खात्रीलायक मजकूर देतील, याची काळजी समुहाच्या प्रमुखाने म्हणजेच ग्रुप ॲडमिनने घेणे बंधनकारक आहे. साहित्य पाठवण्याबाबतच्या नियमांबाबत प्रमुखाने सदस्यांना जाणीव करून द्यावी. वेळोवेळी समुहातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. समूह नियंत्रणाबाहेर जात असेल तर प्रमुखाने सदस्यांचे हक्क काढून घ्यावा आणि समुहावर साहित्य पाठवण्याचा हक्क फक्त स्वत:कडे घ्यावा. समुहावरील आक्षेपार्ह मजकूराबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, हे नियम समूह प्रमुखांसाठी असतील. उल्लंघन झाल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे.
या नियमांचे उल्लंघन केल्यास ....
या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेतील कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, ५०५, १८८ माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ क आणि ड, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४, मुंबई पोलीस कायद्यातील कलम ६८ आणि फौजदारी दंड संहितेतील कलम १४४अन्वये गुन्हा नोंद केला जाईल, असे सायबर महाराष्ट्रने स्पष्ट केले आहे.
येथे करा तक्रार...
कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सअप किंवा अन्य समाज माध्यमांवर पसरवू नयेत, तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.