Join us

शेअर रिक्षालाच पसंती

By admin | Published: June 12, 2015 10:50 PM

मीटरसक्तीला रिक्षाचालक जुमानत नाहीत, यासाठी परिवहनमंत्र्यांनी ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्ये प्रीपेड रिक्षासेवेचा शुभारंभ केला

डोंबिवली : मीटरसक्तीला रिक्षाचालक जुमानत नाहीत, यासाठी परिवहनमंत्र्यांनी ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्ये प्रीपेड रिक्षासेवेचा शुभारंभ केला. मात्र, त्याकडे कल्याणकरांनी पाठ फिरविली असून त्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. बहुतांशी प्रवाशांची शेअर रिक्षालाच पसंती आहे. या ठिकाणी आरटीओच्या माध्यमातून १०० प्रवाशांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातही ९५ प्रवाशांनी शेअर पद्धतीला पसंती दिली असून अवघ्या ५ जणांनी प्रीपेडला प्राधान्य दिल्याचे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कल्याण रेल्वे स्थानकातून आरटीओ कार्यालय परिसरात जाण्यासाठी प्रीपेड रिक्षाने ६५ रुपये तर शेअरिंगने गेल्यास १२ रुपये द्यावे लागतात. त्यामुळे साहजिकच प्रवाशांचा दुसरा सोयीस्कर आणि परवडणारा पर्याय निवडण्याकडे कल असल्याचेही त्यांनी सांगितले. अशाच पद्धतीने शहरातील अन्य भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मानसिकता असून परवडणाऱ्या पर्यायाला ते प्राधान्य देतात.आरटीओ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ताफा प्रीपेड रिक्षाबाबतची जनजागृती करण्यासाठी स्टेशन परिसरात रोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत प्रवाशांशी संवाद साधतो. लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधून सामान-कुटुंबासह आलेले प्रवासी हे प्रीपेडला प्राधान्य देतात. परंतु, नित्याचा चाकरमानी शेअरिंगकडेच जात असल्याचे निदर्शनास येत आहे. लाखो प्रवासी असले तरी दिवसाला अवघे २५-३० प्रवासीच या सेवेचा लाभ घेत असल्याचे माहितीवरून स्पष्ट झाले आहे.