मुंबई - मनसे कार्यकर्त्यांना नवी दिशा देण्याचे सुतोवाच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. राज यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या झेंड्यातील भगवा रंग नजरेत भरणारा असून महामेळाव्याकरिता लावलेली पोस्टर्स राज यांच्या नव्या महाराष्ट्र धर्माचे संकेत देत आहेत. आता, मनसेने 23 जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनासाठी एका टिझर व्हिडीओ शेअर केला आहे. 16 सेकंदाच्या या व्हिडीओत राज ठाकरेंचा आवाज ऐकू येतो.
मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब केला आहे. या अधिकृत अकाऊंटच्या दोन्ही प्रोफाईलवर केवळ इंजिनाचा फोटो दिसत आहे. त्यानंतर, आता राज ठाकरेंच्या आवाजातील हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महाराजांच्या जर सगळ्या लढाया आपण पाहिल्या, तर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता, असे शब्द राज यांच्या एका भाषणातील आहेत. त्यामुळे, मनसे आता मराठीवरुन हिंदवी स्वराज्याच्या मुद्द्यावर येत असल्याचं दिसून येतंय.
राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप व मनसे यांनी परस्परांवर बरीच चिखलफेक केल्यामुळे आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर मनसेबरोबर भाजपचा सूर जुळेल का? या व अशा अनेक मुद्द्यांबाबत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते व सर्वसामान्यांमद्ये चर्चा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 23 जानेवारीच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. बॅनर, पोस्टर, टॅगलाईन आणि प्रोफेशनल इव्हेंटप्रमाणे सगळं दिसून येत आहे.