Join us  

एअरलाइन्सचे शेअर्स आणायचे होते जमिनीवर; म्हणून दिली विमानतळ उडविण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 7:04 AM

शाहजहानला महाराष्ट्र एटीएसने सहार पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.  

मुंबई : दहा लाख बिटकॉइन्स द्या, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल २ बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देणाऱ्या फेबिन शाहजहानला (२३) प्रत्यक्षात एअरलाइन्स उद्योगांचे शेअर्सचे भाव जमिनीवर आणायचे होते. म्हणून त्याने हा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे. शाहजहानला महाराष्ट्र एटीएसने सहार पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.  

केरळचा असलेला शाहजहान बीबीएचा विद्यार्थी असून, तो शेअर मार्केटचेही काम करायचा. त्याला काही तासांत करोडपती व्हायचे होते. ४८ तासांत मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोट होईल, अशी नकारात्मक बातमी दिल्यास एअरलाइन्स उद्योगांचे शेअर्स गडगडतील, असा त्याचा होरा होता. इन्स्टाग्रामवरून त्याने अशा प्रकारचे व्हिडीओ पाहिले होते. 

अहवालाची प्रतीक्षा !

आरोपी शाहजहानचा प्लॅन आम्हाला सापडला आणि आम्ही शेअर मार्केटच्या अधिकाऱ्यांना शहाजहानचे ट्रेडिंग अकाउंट तपासण्यास कळवले. आम्हाला असेही आढळून आले की, आरोपी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली असून, आम्ही शेअर बाजार अधिकाऱ्यांच्या अहवालाची वाट पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नफा मिळाला...

शहाजहानने हाय सिक्युरिटी आलेल्या एअरलाइन कंपनीची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी एअरलाइन इंडस्ट्रीला निवडले. ई-मेल पाठवण्यापूर्वी सोशल मीडियावरून स्वतःचे प्रोफाइलही हटवले. मेल पाठवल्यावर त्याने एअरलाइनचे शेअर्स खरेदी केले आणि नफा मिळण्याची वाट पाहिली. अखेर २३ नोव्हेंबरला अनेक एअरलाइन्सचे शेअर्स १-२% घसरले व शाहजहानला चांगला नफा मिळाला. त्याच रात्री त्याला एटीएसने अटक केली.