पावसाच्या अंदाजाने शेअर बाजारात आली ‘बहार’!
By admin | Published: May 11, 2017 01:08 AM2017-05-11T01:08:51+5:302017-05-11T01:08:51+5:30
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेअर बाजारात चैतन्य सळसळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेअर बाजारात चैतन्य सळसळले आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सार्वकालिक विक्रमी पातळीवर बंद झाले आहेत.
हवामान खात्याने काल केलेल्या भाकितानुसार, यंदा मान्सून चांगला राहणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा शुभसंकेत असल्याने, आज
त्याचे चांगले परिणाम शेअर बाजारांत दिसून आले. खते आणि गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना जोरदार मागणी दिसून आली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ३१४.९२ अंकांनी अथवा १.0५ टक्क्यांनी वाढून ३0,२४८.१७ अंकांवर बंद झाला. या आधी २६ एप्रिल रोजीचा ३0,१३३.३५ अंकांवरील बंद हा सेन्सेक्सचा सर्वोच्च बंद होता. हा विक्रम सेन्सेक्सने आज मोडला. सेन्सेक्सचा इंट्रा-डे विक्रम २७ एप्रिलचा ३0,१८४.२२ अंकांचा होता. सेन्सेक्सने ३0,२७१.६0 अंकांची पातळी गाठून तोही आज मोडला. ५0 कंपन्यांचा निफ्टी ९0.४५ अंकांनी अथवा 0.९७ टक्क्यांनी वाढून ९,४0७.३0 अंकांवर बंद झाला. ४ मे रोजीचा ९,३५९.९0 अंकांचा विक्रम निफ्टीने मोडला.
संमिश्र कल
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँगचा हँग सेंग आणि जपानचा निक्केई हे निर्देशांक वाढले. इतर ठिकाणी नरमाईचा कल राहिला. युरोपातील बाजारांपैकी फ्रान्सचा कॅक, जर्मनीचा डॅक्स हे निर्देशांक घसरले. लंडनचा एफटीएसई मात्र वाढला. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर, मद्रास फर्टिलायझर्स, तसेच चंबल फर्टिलायझर्स आदी शेतीशी निगडित कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा जोर वाढल्याचे दिसून आले.
कोणाला झाला फायदा-
भारती एअरटेलचा समभाग सर्वाधिक ७.८७ टक्क्यांनी वाढला. त्या पाठोपाठ एचयूएल, एचडीएफसी, एमअँडएम, रिलायन्स, बजाज आॅटो, अॅक्सिस बँक, मारुती, सिप्ला, टाटा मोटर्स यांचे समभाग वाढले. विप्रो, एशिएन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि गेल यांचे समभाग मात्र घसरले.
हवामान खात्याने पावसाबद्दल वर्तविलेल्या अंदाजाने शेअर बाजारात तेजीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे दोन्ही निर्देशांक नव्या उंचीवर पोहोचले आहेत.
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस