विलेपार्ले पोलीस; व्हिडिओद्वारे मुंंबईकरांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : कोरोना संसर्गाच्या संकटामुळे ऑनलाइन व्यवहार वाढत असताना सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईकरांना जागरुक करण्यासाठी विलेपार्ले पोलिसांनी एक व्हिडिओ बनवून नागरिकांना सतर्क करण्यास सुरुवात केली आहे. ‘बँक कधीही तुमची खासगी माहिती विचारत नाही, त्यामुळे ओटीपी शेअर करू नका’, असा संदेश व्हिडिओद्वारे दिला जात आहे.
विलेपार्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी हा व्हिडिओ तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ज्या बँकेत आपले खाते आहे त्याच बँकेतून बोलत असल्याचा आव आणत सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या बोलण्यात गुंतवून त्यानंतर खासगी माहिती, एटीएमचा पिन किंवा ओटीपी क्रमांक मागतात. यातील बऱ्याच आराेपींना कॉल सेंटरमधील कामाचा अनुभव असल्याने त्यांच्या बोलण्यात सामान्य नागरिक तसेच विशेषतः ज्येष्ठ नागरिक फसल्याची बरीच प्रकरणे आहेत. त्यामुळे स्वतःच्या बँक खात्याची खासगी माहिती ज्यात ओटीपी, पिन क्रमांक यांचा समावेश आहे ती कधीच फोनवर उघड करू नका. कारण, बँक कधीच ग्राहकांचे खासगी डिटेल्स मागत नाही, ही बाब काणे यांनी व्हिडिओमार्फत स्पष्ट केली. हा व्हिडिओ सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाल्याने महिला आणि वृद्ध यामुळे सतर्क राहून आपल्या बँक खात्याला रिकामे होण्यापासून वाचवू शकतील, असा विश्वास विलेपार्ले पोलिसांनी व्यक्त केला.