Join us

"आदित्य असं काही करेल वाटत नाही"; दिशा सालियान प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 1:32 PM

Disha Salian: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहे.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारकडून विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्याचे आदेश देताच, मुंबई पोलिसांनी मंगळवारी एसआयटी स्थापन केली आहे. अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या बाबी, तसेच कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. यातून आवश्यक वाटल्यास संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. त्यानुसार, एसआयटी पथक तपास करत आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची देखील चौकशी होणार असल्याची चर्चा रंगली जात आहे. यावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात उपस्थित असताना पत्रकारांनी आदित्य ठाकरेंच्या एसआयटी चौकशीबाबतच्या प्रश्न विचारला. यावर आदित्य असं काही करेल, असं वाटत नाही. चौकशा होत राहतात. आम्ही देखील यातून गेलो आहोत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

भाजपा ज्यांना घाबरतो त्यांच्यावरच घाणेरडे आरोप केले जातात. त्यांचीच बदनामी केली जाते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले की, ते असे वातावरण निर्माण करतात. आरोप करणे त्यांचे धोरण आहे. त्यांना भीती वाटते, हे चांगले आहे, अशा शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब-

८ जूनच्या २०२०  मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून  दिशा पडली होती. ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.  शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

टॅग्स :आदित्य ठाकरेशर्मिला ठाकरेपोलिसमहाराष्ट्र सरकार