शशांक राव यांनी कामगारांची फसवणूक केली? केवळ तीन हजारांची पगारवाढ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:41 AM2019-01-18T05:41:15+5:302019-01-18T05:42:04+5:30
अनिल परब यांचा गंभीर आरोप
मुंबई : बेस्ट कामगारांचा नऊ दिवसांचा संप मिटला असला तरी त्याचे राजकीय कवित्व अद्याप सुरू आहे. कामगारांना सात हजारांची वेतनवाढ मिळणार असल्याचा शशांक राव यांचा दावा साफ खोटा असून सात नव्हेतर, फक्त ३,४२८ रुपयांचीच वाढ मिळणार आहे. स्वत:चे राजकीय महत्त्व आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठीच राव यांनी बेस्ट कामगारांसह मुंबईकरांना वेठीस धरले होते, असा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी गुरुवारी केला.
शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत परब यांनी बेस्ट संपाबाबतचा न्यायालयीन निकाल फडकवत कामगार नेते शशांक राव यांच्यावर कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप केला. नऊ दिवसांच्या संपानंतरही कामगारांच्या हाती काही लागलेले नाही. निवडणुकीचे वर्ष असल्याने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी राव कळसूत्री बाहुलीप्रमाणे संप रेटत होते. संपासाठी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांनी मदत केल्याचे राव यांच्या सहकाऱ्यांनीच कबूल केले आहे. त्याशिवाय काही अदृश्य हातही यात होते, असा आरोप परब यांनी केला.
पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट अर्थसंकल्पाच्या विलीनीकरणाची सर्व प्रक्रिया शिवसेनेने पार पाडली आहे. बेस्ट समिती, स्थायी समिती आणि त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या प्रस्तावास मान्यता मिळाली. मात्र, शशांक राव यांची युनियनच त्याविरोधात न्यायालयात गेली. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत विलीनीकरण शक्य नसल्याचे परब यांनी सांगितले.
शिवसेनेने कायमच प्रशासन आणि कामगार यांच्यात सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वच कामगारांचा सारासार विचार करत १७८ कोटी रुपयांची हंगामी वाढ स्वीकारण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या बैठकीत मांडली होती. मात्र, शशांक राव यांनी कनिष्ठ वेतनश्रेणीपुरताच
हा विषय मर्यादित ठेवण्याचा हट्ट धरला आहे. त्यामुळे १७८ कोटी रुपयांच्या जागी आता कामगारांच्या वाट्याला केवळ ५२ कोटी रुपयेच आल्याचा दावाही अनिल परब यांनी केला.
युनियन निवडणुकीसाठीच स्टंटबाजीचा आक्षेप
शशांक राव यांच्या युनियनची लोकप्रियता घसरली आहे. २६ हजारांवरून केवळ १३ हजारांवर सभासद संख्या आली आहे. तर शिवसेनेकडे १० हजार सभासद आहेत. पुढील महिन्यात युनियनच्या निवडणुका आहेत, त्यासाठी संपाचा डाव मांडला गेल्याचा दावा अनिल परब यांनी केला.