शास्त्रीनगरमध्ये झोपडीदादाची दहशत
By admin | Published: September 13, 2014 01:42 AM2014-09-13T01:42:45+5:302014-09-13T01:42:45+5:30
हजारो झोपड्या असलेल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीत सध्या पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी येथे असलेल्या ५१४ झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे
सायन : सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये असलेले शास्त्रीनगर सध्या झोपडीदादाच्या दहशतीखाली आहे. येथील राजू कामाठी नामक झोपडीदादा स्थानिकांना धमकावत असल्याचे निवेदन शास्त्रीनगर (सायन) एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था या स्थानिक रहिवासी संघटनेने गृहमंत्री आर.आर. पाटील यांना दिले आहे.
हजारो झोपड्या असलेल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीत सध्या पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी येथे असलेल्या ५१४ झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३९३ झोपडीधारकांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले असून अन्य झोपडीधारक कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. शिवाय पात्र ठरलेल्या काही झोपडीधारकांना भाडे आणि संक्रमण शिबिर मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्याही एसआरए प्रशासनाकडून मिळवल्याची माहिती रहिवाशांनी स्थापन केलेल्या गृहनिर्माण संस्थेने दिली आहे.
दरम्यान, प्रकल्पात खोडा घालण्यासाठी स्थानिक झोपडीदादा राजू कामाठी धमक्या देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यापूर्वी स्थानिकांना धमकावल्याप्रकरणी ट्रक टर्मिनल पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र त्या वेळी गुन्हा नोंदवला नसल्याने त्याची हिंमत जास्तच वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या वेळी दहशतीविरोधात उभे राहत मोठ्या हिमतीने गृहनिर्माण संस्थेने झोपडीदादाविरोधात थेट गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आपल्या खाक्या दाखवत या दादाला चाप लावणार का, याची प्रतीक्षा स्थानिकांना आहे. यासंदर्भात तक्रार आल्यास नक्कीच प्रतिबंधात्मक कारवाई करू, अशी प्रतिक्रिया ट्रक टर्मिनल पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)