शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आता महिला टीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:33 AM2018-03-08T05:33:19+5:302018-03-08T05:33:19+5:30
महिला दिनाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक केली आहे, तसेच ट्रेन क्रमांक १२९५१ मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित द्वितीय दर्जाच्या बोगीत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन कार्यान्वित केले आहे.
मुंबई - महिला दिनाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक केली आहे, तसेच ट्रेन क्रमांक १२९५१ मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित द्वितीय दर्जाच्या बोगीत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन कार्यान्वित केले आहे.
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सद्यस्थितीत आॅन बोर्ड २ महिला तिकीट तपासनीस कार्यरत आहेत. महिला सर्व प्रकारच्या कामगिरीवर यशस्वी होऊ शकतात, हा संदेश कृतीतून देण्यासाठी, पश्चिम रेल्वेने प्रतिष्ठित मानल्या जाणाºया शताब्दी एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीस म्हणून महिला कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.
राजधानी एक्स्प्रेसमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून महिला प्रवाशांना पॅड उपलब्ध होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेवर ५ मे १९९२ रोजी पहिली महिला विशेष लोकल पश्चिम रेल्वेवर धावली होती. आता महिला सक्षमीकरणासाठी पश्चिम रेल्वेने माटुंगा रोड स्थानक महिला विशेष करण्याची घोषणा केली
आहे.
महिला दिनानिमित्त कल्याण येथून ८ वाजून ०१ मिनिटांनी सुटणाºया महिला विशेष लोकलमध्ये महिला कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोयना आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी महिला तिकीट तपासनिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला लोको पायलटसह सर्व महिला कर्मचारी असलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला, महिला दिनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा हिरवा झेंडा दाखविणार आहेत. महिला दिनानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध महिलाविषयक उपक्रमांची रेलचेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १४ वर महिला विश्रामगृहात सॅनिटरी नॅपकिन पॅड वेंडिंग मशिन कार्यान्वित करण्यात येणार आहे.