शताब्दी एक्स्प्रेस आज विशेष रेकसह धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:02 AM2018-07-13T06:02:20+5:302018-07-13T06:02:42+5:30
नुकताच अपग्रेड करण्यात आलेल्या शताब्दी एक्स्प्रेसला वसई-विरार येथील पुराचा फटका बसला. परिणामी शुक्रवारी ट्रेन क्रमांक १२००९/१० मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस विशेष रेकसह चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
मुंबई - नुकताच अपग्रेड करण्यात आलेल्या शताब्दी एक्स्प्रेसला वसई-विरार येथील पुराचा फटका बसला. परिणामी शुक्रवारी ट्रेन क्रमांक १२००९/१० मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस विशेष रेकसह चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. मात्र, या एक्स्प्रेसच्या वेगावर मर्यादा येणार आहे.
प्रोजेक्ट सुवर्ण अंतर्गत शताब्दी एक्स्प्रेसच्या बोगी ‘अपग्रेड’ करण्यात आल्या होत्या. वसई-विरारच्या पुरामध्ये एक्स्प्रेसच्या इंजिनासह बोगीत पाणी गेल्यामुळे रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे आता ही ट्रेन तीन वातानुकूलित चेअरकार, दोन वातानुकूलित चेअरकार, एक अनुभूती बोगी आणि वातानुकूलित चेअरकारच्या ऐवजी एसी ३ टायरच्या १२ बोगींसह धावणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस १३० किमी. प्रतितास या वेगाने धावते. मात्र शुक्रवारी धावणाऱ्या शताब्दीचा वेग हा ताशी १०० ते ११० किमी असणार आहे.
शताब्दी एक्सप्रेसमध्ये पाणी गेल्यामुळे मुंबई सेंट्रल येथील बोगी देखभाल विभागात बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
सात दिवस लागणार
पूरामुळे १० रेकच्या इंजिनमध्ये पाणी गेले आहे. यामुळे या रेक पुन्हा सेवेत आणण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागेल. दरम्यान संपूर्ण पॉईंट पाण्याखाली गेल्याने वसई-विरार भागात तांत्रिक बिघाड उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल आणखी काही दिवस विलंबाने धावतील.
- ए.के.गुप्ता, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
आज ७० लोकल रद्द
पश्चिम रेल्वेवरील रेकची मर्यादा आणि तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाºया ७० लोकल फेºया रद्द करण्यात आल्या. तर १२५ लोकल फेºया विलंबाने सुरु होत्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.