मुंबई : कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे (शताब्दी रुग्णालय) लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी येथे बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येईल. या रुग्णालयात कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी, सिटीस्कॅन आदी विविध अद्ययावत सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होतील.
पश्चिम उपनगरात गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाची पुनर्बांधणी सुरू आहे. त्यानंतर थेट बोरीवली येथे भगवती रुग्णालय असल्याने गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरातील रुग्णांची गैरसोय होते. हृदयविकार व अन्य मोठ्या आजारांसाठी पश्चिम उपनगरातील रुग्णांना शहर भागातील प्रमुख रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय अद्ययावत करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. यासाठी आवश्यक रुग्णालयाच्या कामांना राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार येथे दहा मजली इमारत उभारण्यात येईल. या रुग्णालयात किमान ३२५ बेड असतील.
या कामामध्ये बाधित ठरणारी विविध प्रकारची ८४२ झाडे हटविण्यात येणार आहेत. यापैकी केवळ १४९ झाडांची कत्तल करण्यात येणार असून उर्वरित झाडांचे पुनर्रोपण याच रुग्णालयाच्या परिसरात करण्यात येईल. लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
...........................