आषाढातच श्रावणसरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 06:47 AM2019-07-10T06:47:28+5:302019-07-10T06:48:15+5:30

कोसळधारेनंतर मुंबई तापली; ऊन-पावसाचा खेळ, ठिकठिकाणी तुरळक सरींचा शिडकावा

Shawnasari in ashadh | आषाढातच श्रावणसरी!

आषाढातच श्रावणसरी!

Next

मुंबई : सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी मुसळधार बरसलेल्या पावसाने मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली. मात्र, ठिकठिकाणी तुरळक सरींचा शिडकावा होत असतानाच रंगलेल्या ऊन-पावसाच्या खेळामुळे जणू आषाढातच मुंबईकरांना श्रावणसरींचा अनुभव घेता आला. या तुरळक सरी वगळता मुंबई तशी कोरडीच राहिली.


मुंबईत मंगळवारी २०० मिलीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात तो खोटा ठरला आणि ऊन-पाऊस असे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई पालिका आपत्कालीन कक्षाच्या माहितीनुसार, मालाडमध्ये भिंत कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेतील एका मुलीचा मृतदेह वर्सोवा समुद्रकिनारी आढळला.
तिचे नाव सोनाली सुनील सपकाळ (२४) असे असून, मृतदेह नाल्यामधून वाहून समुद्रात गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

४२ ठिकाणी झाडे पडली
शहरात ६, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण १८ ठिकाणी घरांचा भाग कोसळला. शहरात १६, पूर्व उपनगरात ५, पश्चिम उपनगरात ११ अशा एकूण ३२ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. याचप्रमाणे शहरात १, पूर्व उपनगरात ८, पश्चिम उपनगरात ३३ अशा एकूण ४२ ठिकाणी झाडे पडली.
मान्सूनची आगेकूच
मान्सून राजस्थान आणि हरियाणाच्या उर्वरित भागात, पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

कोकणासह नाशिक व साताऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील चार दिवस कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून १५ जुलैनंतर मराठवाड्यात मोठ्या पावसाची अंदाज हवामान खात्याने वर्तवला.


मालवणीत बांधकामाचा भाग कोसळला
मालाड येथील मालवणी गेट नंबर ७ मधील तळमजला अधिक एक असलेल्या बांधकामाचा भाग मंगळवारी दुपारी ४ वाजता कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सोमवारी सायंकाळी आॅपेरा हाउस येथे निसार हाउस या तळमजला अधिक चार मजले बांधकाम असलेल्या पहिल्या मजल्याचा काही भाग पडला. महापालिकेच्या डी विभागाकडून इमारत रिकामी करण्यात आली असून, इमारतीच्या मालकास इमारत पाडण्याबाबतची नोटीस देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मालकानेही मंगळवारपासून इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे.विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसाठी अंदाज
१० आणि ११ जुलै : मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Title: Shawnasari in ashadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.